समाजमाध्यमांचा भस्मासुर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
समाजमाध्यमे शाप की वरदान, प्रकारचा हा निबंध नाहि. तर समाजमाध्यमांच्या भस्मासुराने मानव जातीलाच कसे गिळंकृत केले आहे, हे समाजमाध्यमांमुळे जे विपरित परिणाम होत आहे, त्यावरून दिसतेच. समाजमाध्यमे अफवा तर पसरवतातच आणि त्यांची ताकद जास्त आहे. समाजमाध्यमांवरील मजकुरामुळे दंगली पेटण्याचा इतिहास आपल्याकडे ताजा आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअप यावरील मजकुरामुळे मने कलुषित होण्याचा प्रकार तर आता शिगेला पोहचला आहे. वेगवेगळ्या जाती आणि धार्मिक गट, राजकीय पक्ष यांच्या अनुयायांमध्ये ज्या हातघाईच्या लढाया होतात, त्या पाहिल्या की समाजमाध्यमांचे विपरित परिणामांपासून समाजाला कोण वाचवणार, असा प्रश्न पड़तो. त्यामुळेच समाजमाध्यमे आजपासून कारवाईच्या कक्षेत आली आहेत. त्यासाठी नैतिक मूल्यसंहिता आजपासून अमलात येत आहे. फेसबुकला नवी मूल्य संहिता मान्य आहे. पण ती ट्विटरला मान्य नाहि. काँग्रेसने कथित टुलकीट जे चालवले, त्यानंतर पोलिसांनी ट्विटरवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. वास्तविक, टुलकिट बाबत मोदी सरकार फारच हळवे झाले. कारण ट्विटरच काय पण फेसबुक किंवा इतरही समाजमाध्यमांवर मोदी यांच्याविरोधात व्यक्तिगत आणि भाजपविरोधी जे काही पोस्ट केले जाते, ते बिभत्सपणाच्या कित्येक पातळ्या ओलांडून गेलेले असते. अर्थात मोदी त्याविरोधात काही बोलू शकणार नाहित. कारण ही सुरूवात भाजपच्याच आयटी सेलने दोन हजार चौदाच्या अगोदर केली होती. आता जशास तसे उत्तर दिले गेले तर त्यात मोदींना किंवा भाजपला तक्रार करण्यास जागा उरणार नाहि. जे काही समाजमाध्यमांत पोस्ट केले जात आहे, दोन्ही बाजूंनी, ते अतिशय गलिच्छ आणि किळसवाणे असते. नवीन पिढी अगदी मुलीही सर्रास समाजमाध्यमांवर अश्लिल शिवीगाळ करतात. वास्तव थरकाप उडवणारे आहे. परंतु लोकांनाही त्याचे काही आता वाटेनासे झाले आहे. म्हणून नैतिक मूल्यसंहिता अमलात आणण्याचे भाजप सरकारने ठरवले आहे. तसे तर हा निर्णय योग्यच म्हणायला हवा. परंतु भाजपच्या बाबतीत तो सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको असे जर विरोधकांनी म्हटले तर भाजपक़डे काहीच समर्थन नाहि. भाजपने राहुल गांधी यांना पप्पू म्हणून सतत हिणवल्याने काँग्रेसकडून फेकू विशेषण आले. दोन्ही पक्षांची एकमेकांवर टिका ही पातळी सोडूनच आहे. पण समाजमाध्यमांनी तिला चांगलीच धार आणली आहे. इतकेच नव्हे तर, समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होण्याची इतकी स्पर्धा असते की व्यक्ति कितीही मोठी असली तरीही काहीही पोस्ट करून तिला आपल्या स्तरावर आणता येते. आणि यात फेसबुक किंवा ट्विटर किंवा इतर कोणत्याही समाजमाध्यमांची चूक अशी की, त्यांचा कंटेंटवर म्हणजे मजकुरावर कसलेच नियंत्रण नाहि. नियंत्रण ठेवले तर पोलिसगिरी होईल, असे त्यांना वाटते. परंतु एका मर्यादेपर्यंतच अभिव्यक्ति स्वातंत्र्य न्यायालयालाही मान्य आहे. मर्यादा सोडून काहीही आक्षेपार्ह मजकूर टाकणे हे न्यायालयही मान्य करत नाहि. या मर्यादा कुठे तरी ठरवायला हव्यात. हे काम नवीन नैतिक मूल्यसंहिता करेल. फेसबुकने नवीन नियमावली मान्य असल्याचे अगदी शेवटच्या दिवशी जाहिर केले. परंतु जनतेच्या स्वतंत्र आणि सुरक्षित व्यक्त होण्याप्रति फेसबुक कटिबद्ध आहे, हे नमूद करायलाही फेसबुक विसरलेले नाहि. याचा अर्थ काय ते फेसबुकच सांगू शकेल. समाजमाध्यमांची ताकद मोठी आहे, हे कुणी नाकारू शकत नाहि. परंतु ती जशी विधायक आहे तशीच विध्वंसकही आहे. शिवाय आता केंद्र सरकार जरी नैतिक मूल्यसंहिता लावत असले तरीही पूर्वी या सरकारला लोकांच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग होत होताच. तसे आरोप झाले होते. याच प्रकारच्या आरोपांमुळे ज्युलियन असांजेला अटक झाली होती. लोक ज्या पोस्टला जास्त लाईक करतात, त्यावरून लोकांची मते राजकीय पक्षांना कळतात आणि तेवढ्याच लोकांना लक्ष्य करता येते. भारतातील सारेच पक्ष यात गुंतले आहेत. यात कुणीही साधू आणि संत नाहि. आता भाजपला शहाणपण सुचवणारी काँग्रेसही यात गुंतली होतीच. तेव्हा याबाबतीत कुणीच कुणाला उपदेश करू नये. नव्या नियमावलीनुसार, फेसबुक आदी माध्यमे त्यांवर काय मजकूर टाकला जातो, यावर लक्ष ठेवतील. तसेच नियमांचे पालन होत आहे की नाहि, यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारीही नेमावा लागणार आहे. हे चांगलेच आहे. परंतु याचे काटेकोरपणे पालन होईल की नाहि, याची खात्री देता येत नाहि. पन्नास लाखांहून अधिक वापरकर्ते असतील तर त्यासाठी ही नियमावली आहे. प्रचंड माहितीजाल आणि ग्राहक असलेल्या फेसबुकला हे स्वप्नातही शक्य नाहि. परंतु सुरूवात तर चांगली आहे. ट्विटरवरही लवकर असेच बंधन येईल. मुळात आपल्याकडे लोकांनाच आपण काय टाकतो, याचे भान नसते. त्यामुळे भारतातील उरी सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हाऊ इज जैश सारखे बाष्कळ आणि देशद्रोही संदेश आपल्याकडे दिले जातात. त्यांच्यावर कारवाई झाली, तो भाग वेगळा. परंतु समाजमाध्यमे ही विषवल्ली आहे आणि तिच्या उपयोगापेक्षा विघातक वापरच जास्त होत आहे. नवीन नैतिक मूल्यसंहिता ही या राक्षसाला बांधून ठेवण्यात यशस्वी झाली तर भावी पिढ्या बरबाद होण्यापासून वाचतील.