साताऱ्यात ‘काळी बुरशी’ने तिघांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
वाई : साताऱ्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजाराने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून या आजाराच्या
एकूण २८ रुग्णांवर सध्या सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
काळी बुरशी या आजारांमध्ये तीस ते साठ वयोगटाच्या अठ्ठावीस रुग्णांवर साताऱ्यात उपचार सुरू आहेत. यातील
नऊ रुग्ण जिल्हा रुग्णालयांत तर एकवीस खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र लहान मुलांमध्ये या
प्रकारच्या लक्षणांचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. या आजाराने जिल्ह्य़ातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे
रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत.
सातारा जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढला आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कोविड आजारानंतर नव्याने
आलेल्या काळी बुरशीजन्य आजाराचा धोकाही वाढला आहे. करोनानंतर होणारा व नव्याने पुढे आलेला काळी
बुरशीचे अठ्ठावीस रुग्ण आढळून आले आहेत. या मधील तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. जिल्हा रुग्णालयात
दोन तर खासगी रुग्णालयात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही लक्षणे असलेला रुग्ण जिल्हा रुग्णालयातच
दाखल होतो असे नसल्यामुळे जिल्ह्य़ातील डॉक्टरांची जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्य़ातील खासगी व सरकारी
दवाखान्यातील या प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास याबाबत जिल्हा रुग्णालय व जिल्हा अधिकारी
कार्यालयाला माहिती देणे केंद्र शासनाच्या नियमान्वये बंधनकारक आहे व तसे आदेश सर्व रुग्णालयांना
बजावण्यात आले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी जिल्हा स्तरावर कान-नाक-घसा, डोळय़ांचे डॉक्टरांची तसेच
प्रयोगशाळा तज्ज्ञांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या आजारावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात कक्ष
तयार करण्यात आला आहे. याबाबतच्या उपचारासाठी आम्ही खासगी डॉक्टरांची ही मदत घेणार आहोत. यामध्ये
आम्ही संशयित रुग्णांवर सर्वाच्या मदतीने उपचार करणार आहोत.