सचिन तेंडुलकरने सांगितली 'मन की बात'
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आठ वर्षे होऊन गेली. परंतु, अजूनही त्याचे अनेक विक्रम अबाधित आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे असंख्य विक्रम त्याच्या नावे असून २०० कसोटी सामने खेळणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. मात्र, असे असले तरी सचिनला दोन गोष्टींची कायम खंत वाटत राहणार आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर व वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हीव्ह रिचर्ड्स हे सचिनचे आदर्श होते आणि त्यांच्यासोबत कधीही खेळायला मिळाले नाही याची सचिनला कायम खंत वाटत राहील, असे त्याने सांगितले.
माझे बॅटिंग हिरो
मला दोन गोष्टींची कायम खंत वाटत राहील. पहिली गोष्ट म्हणजे मला सुनील गावस्कर यांच्यासोबत खेळता आले नाही. लहानपणी ते माझे बॅटिंग हिरो होते. मला एकाच संघातून त्यांच्यासोबत खेळायचे होते. परंतु, मला ती संधी मिळाली नाही आणि या गोष्टीची मला आयुष्यभर खंत वाटत राहील. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच ते निवृत्त झाले होते, असे सचिनने सांगितले.
रिचर्ड्स यांच्याविरुद्ध खेळायचे होते
तसेच रिचर्ड्स यांच्याविषयी सचिन म्हणाला, माझे दुसरे हिरो सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याविरुद्ध मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही खेळता आले नाही. ही माझ्या आयुष्यातील दुसरी खंत आहे. परंतु, सुदैवाने कौंटी क्रिकेटमध्ये मी त्यांच्याविरुद्ध खेळलो होतो. रिचर्ड्स १९९१ मध्ये निवृत्त झाले, पण त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्हाला एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकली नाही.