शिवसेना खासदार भावना गवळींना ED कडून समन्स
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री (27 सप्टेंबर) भावना गवळी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तर,आज (29 सप्टेंबर) भावना गवळी यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेनेसाठी आता हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचं कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीकडून नुकतीच अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी केला आहे. दरम्यान, सईद खान यांच्या अटकेनंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या चर्चा सुरु असतानाच ईडीकडून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गवळींच्या निकटवर्तीयांना यापूर्वीही ED च्या नोटीसा
ईडीने 30 ऑगस्ट रोजी देखील वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या भावना गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर 100 कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. त्यानंतर, गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधी आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवलं होतं. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा अशी मागणी 6 सप्टेंबर रोजी केली होती.
नेमका प्रकरण काय?
वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली. 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय?, त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.