शुद्धिकरणाचे राजकारण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राजकीय पक्षांच्या समजुती अजूनही मध्ययुगीन काळातल्या आहेत, हे तर स्पष्टच आहे. लोकानुनयी राजकारणात लोक खुष कसे होतील, यालाच प्राधान्य असते. म्हणून लोकांना कशामुळे बरे वाटेल, याचा विचार करून राजकीय पक्ष तशीच कृती करत असतात. केंद्रिय मंत्रि नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाला भेट दिल्यावर नादान शिवसैनिकांनी राणे जिथे उभे राहिले, ती जागा पाण्याने धुऊन शुद्ध केली. हे कृत्य तद्दन मूर्खपणाचे होते. शिवसैनिकांच्या भावनांचा हा प्रश्न आहे, असे शिवसेना म्हणू शकते. त्यांच्यासाठी त्यांचे हे समर्थन योग्यही आहे. माध्यमांना सध्या शिवसेनेचे प्रेम उतू चालले असल्याने एकाही मराठी आणि स्वतःला प्रागतिक म्हणवणार्या वर्तमानपत्राने यावर काहीही टिप्पणी केली नाहि. शिवसेनेची भाजपशी युती असती तर मात्र वर्तमानपत्रांनी शिवसेनेवर टिकेची झोड उठवली असती. पण भाजपही या मूर्खपणात शिवसेनेच्या जराही मागे नाहि. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वैष्णो देवीचे दर्शन घेतले म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलाने प्रदक्षिणा मार्गाचे शुद्धिकरण केले. राहुल गांधी हे अर्ध भारतीय आणि अर्धे ख्रिश्चन आहेत. पण म्हणून ते ज्या प्रदक्षिणा मार्गाने गेले म्हणून तो मार्गच धुऊन टाकणे हे नुसते नादानपणाचे नव्हे तर अजूनही मध्ययुगीन समजुतीतच आपण वावरत आहोत, याचे निदर्शक आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. काँग्रेसने यासंदर्भात भाजपवर केलेली टिका ही अगदी रास्त आहे. काँग्रेसने म्हटले आहे की राहुल गांधी हे फक्त वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांनी कोणतीही राजकीय चर्चा ही केली नाहि. तरीही भाजपने दुटप्पीपणाचे राजकारण केले. अर्थात काँग्रेसच्या टिकेतही एक ढोंगीपणा आहेच. राहुल गांधी हे एरवी धर्मनिरपेक्ष म्हणवतात. काँग्रेस स्वतःला निधर्मी म्हणवते. अल्पसंख्यांकाच्या लांगुलचालनासाठी काँग्रेसने आतापर्यंत हिंदूं हितविरोधी असंख्य निर्णय घेतले आहेत. किंबहुना काँग्रेसच्या अति लांगूलचालनवादी धोरणामुळेच भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी शक्तिंना देशात बळ मिळाले आहे. अल्पसंख्यांकांचा या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे, असे म्हणणार्या काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे मोदी यांना जोरदार पाठिंबा मिळाला. हिंदूंचा बॅकलॅश म्हणून काँग्रेसला २०१४ च्या निवडणुकीत धड विरोधी नेता निवडता येईल, इतक्याही जागा मिळाल्या नाहित. पण २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काँग्रेसचे नेते निवडणूक आली की मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावतात. राहुल यांनी स्वतःची जात ब्राम्हण सांगितली होती. केवळ हिंदू मतांसाठी राहुल आणि काँग्रेसने ही चाल खेळली होती. आताही उत्तरप्रदेश या प्रमुख राज्यात निवडणुका होत आहेत. भाजपचे योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याने त्यांच्या धार्मिक ध्रुविकरणाच्या राजकारणास काँग्रेसचे हे उत्तर आहे. पण म्हणूनच राहुल यांचा हा ढोंगीपणा समोर आला आहे. अर्थात कुणी कुठे भेटी द्याव्या, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहुल हे जर खर्या भक्तिभावाने वैष्णोदेवीचे पायी दर्शन घेत असतील तर त्यांच्यावर टिका करण्यात काहीच अर्थ नाहि. पण ते मतांसाठी करत आहेत, अशी शंका येऊ शकते. कारण काँग्रेसचे सबगोलंकारी धोरण आहे. काँग्रेस एकाचवेळी सर्व धर्मियांना खुष ठेवण्याचा प्रयत्न करते आणि कुणीच खुष होत नाहि. राजीव गांधी यांनी १९८७ मध्ये हिंदू कट्टरपंथीयांना म्हणजे विश्व हिंदू परिषदेला अयोध्येत शिलान्यास करण्याची परवानगी दिली, ते कृत्य पश्चात्तापाचे होते. कारण त्याअगोदर शाहबानो प्रकरणात पुरूषी वर्चस्ववादी शक्तिंना खुष करण्यासाठी राजीव गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही फिरवला होता. अर्थात त्याचा काँग्रेसला काहीच उपयोग झाला नाहि, हा भाग वेगळा आहे. दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची काँग्रेसची ही वृत्ती नेहमीच दिसून आली आहे. आणि याच वृत्तीमुळे भाजपच्या धार्मिक ध्रुविकरणाच्या अत्यंत घातक अशा धोरणाला यश मिळत आले आहे. राहुल यांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याच्या मार्गाला गंगाजलाने धुऊन काढणे हे भाजपच्या याच धार्मिक ध्रुविकरणाचा एक भाग आहे. यामुळे हिंदू कट्टरवादी प्रसन्न होतील आणि मतांचे दान उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये भाजपच्या पारड्यात टाकतील, असे भाजपला वाटते. उत्तरप्रदेश निवडणुका जसजशा जवळ येतील, तसे काँग्रेस आणि भाजपकडून धार्मिक राजकारणाला रंग येईल. राहुल यांच्या या वैष्णोदेवी भेटीवरून भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. भाजपने राहुल हे राजकीय मतलब साधण्यासाठी वैष्णोदेवीची यात्रा करत असल्याचा आरोप केला आहे. तर राहुल यांनी आपण एकही राजकीय गोष्ट बोललो नाहि, असे स्पष्ट केले आहे. पण सत्य हेच आहे की दोघांनाही उत्तरप्रदेशातील निवडणूक खुणावते आहे. मात्र राहुल यांनी असे म्हणतानाच यात्रेच्या मार्गावर काँग्रेसचे झेंडे का फडकवले गेले, याचेही उत्तर दिले पाहिजे. यात्रा राजकीय नव्हती तर काँग्रेसच्या झेंड्यांचे काय काम, असाही प्रश्न विचारला पाहिजे. दोन्ही पक्ष राजकारणात गुंतले आहेत आणि त्यातून धार्मिक यात्रा आणि देवीदेवताही सुटल्या नाहित. यावरून आपले पक्ष किती प्राथमिक अवस्थेत आहेत, हेच दिसते. शिवसेना असो की, भाजप किंवा काँग्रेस, कुणीच राजकीय प्रगल्भता गाठलेली नाहि. हे फारच वेदनादायी आहे.