राज्यपालांच्या पत्राला उत्तराची आवश्यकता नाही : प्रवीण दरेकर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा पत्र संघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी पत्राद्वारे केली होती. आता राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्राद्वारे संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केलीय. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केलाय.
'राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारचं उत्तर देणं दुर्दैवी आहे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यपाल किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा वाद प्रत्येक ठिकाणी उभा करणं दुर्दैवी आहे. असं काही कारण नाही, ते योग्य ठरत नाही. राज्यपालांनी शेवटी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं भूमिका मांडली आहे. राज्यपालांनी केलेल्या सूचना सकारात्मक घ्यायला हव्या. आपण विचारलेल्या प्रश्नाला सांगितलेल्या सूचनेविषयी केंद्राकडे बोट दाखवून दूर पळता येणार नाही. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना हजारोंच्या संख्येनं झाल्या आहेत. अशावेळी साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी जर सुचवलं असेल, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर मला वाटतं अशाप्रकारचं अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही', असं प्रवीण दरेकर म्हणाले.