मलेरियापाठोपाठ लेप्टो, डेंग्यूची रुग्णवाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : पावसाळी आजारांचे रुग्ण मुंबईत आढळत असून ऑगस्टच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांची संख्या घटलेली असली तरी डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आढळून आले आहे. डेंग्यू आणि लेप्टोने मुंबईत आतापर्यंत सात बळी घेतल्याचेही पालिके च्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे चिकुनगुनिया आजाराचे पाच रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले आहेत. गेल्या तीन वर्षात या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या थोडी कमी होऊ लागली आहे. मात्र इतर आजारांनी डोके वर काढले आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी डेंग्यूचे रुग्ण मात्र वाढले आहेत. तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून चिकुनगुनिया आजाराच्या एकही रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र सप्टेंबरमध्ये त्याचे पाच रुग्ण आढळले. पालिके च्या सप्टेंबर महिन्याच्या आकडेवारीत ही नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच डास चावू नयेत म्हणून काळजी घ्यावी, कोणताही आजार असल्यास स्वत: औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिके च्या आरोग्य विभागाने के ले आहे.
सात बळी… सप्टेंबरमध्ये पावसाळी आजारांमुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली नसली तरी ऑगस्टमध्ये डेंग्यू व लेप्टोने सात बळी घेतले आहेत. सप्टेंबरच्या अहवालात या मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लेप्टोचे चार बळी तर डेंग्यूचे तीन बळी आहेत. १८ वर्षांचा एक तरुण, ४४ वर्षांची महिला, तर पाच महिन्यांचा एक बालक यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर लेप्टोच्या मृतांमध्ये १० ते ४५ वर्षांच्या पुरुषांचा समावेश आहे.