मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला प्रथम प्राधान्य – दानवे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जालना : जालना आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य राहील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे सांगितले. या मार्गाच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर एकदा अहवालाचे सादरीकरण झालेले आहे. परंतु या प्राथमिक सादरीकरणात कांही दुरुस्त्या सुचविण्यात आल्याने आता येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दुसरे सादरीकरण होणार असल्याचे दानवे म्हणाले.
जालना रेल्वेस्थानकाजवळ तयार करण्यात येणाऱ्या 4 कोटी 65 लाख रुपये खर्चाच्या भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटय़ाल, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, नगराध्यक्षा संगीता गोरंटय़ाल यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.
या वेळी दानवे म्हणाले, बुलेट ट्रेनमुळे मुंबईपासून औरंगाबादचा प्रवास दीड तासात होईल. तर जालन्यापर्यंतचा प्रवास पाऊणे दोन तासात होईल. अशा प्रकारचे सात मोठे प्रकल्प देशात होणार असून त्यामध्ये आठवा प्रकल्प म्हणून या मार्गाचा समावेश करणार आहे. फक्त रेल्वे वाहतुकीसाठी दिल्ली ते मुंबईतील जेएनपीटी दरम्यान मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग टाकण्यात येणार असून हा प्रकल्प ५० हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. पूवरेत्तर राज्यांसाठी असाच एक स्वतंत्र मार्ग करण्यात येणार आहे. रेल्वेच्या मालवाहतुकीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. क्रॉसिंगसाठी मालगाडय़ांना थांबावे लागते आणि त्यांच्या गतीवर परिणाम होतो. रेल्वेस प्रवासी वाहतुकीत तोटा होतो.