मुंबईत क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीचा छापा; अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत क्रूझवर छापा टाकून १० जणांना अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर रेव्ह पार्टी होत होती आणि एनसीबीने आरोपीला रंगेहाथ पकडले. यामध्ये एका मोठ्या बॉलिवूड कलाकाराच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) शनिवारी छापे टाकल्यानंतर कोकेन, चरस आणि एमडी सारख्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आणि किमान १० लोकांना ताब्यात घेतले आहे. एनसीबीची ही कारवाई सुमारे ७ तास चालली. या क्रूझवर अनेक हाय-प्रोफाइल आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.
एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली. “आतापर्यंत आमच्याकडून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. “आम्ही काही व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. तपास सुरू आहे. ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. आम्ही ८-१० व्यक्तींची चौकशी करत आहोत,” असे समीर वानखेडे यांनी म्हटले. या पार्टीमध्ये कोणती सेलिब्रिटी उपस्थित होती का असे विचारले असता त्यांनी मी त्यावर भाष्य करू शकत नाही असे म्हटले आहे.
माहितीच्या आधारावर एनसीबीने शनिवारी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला. मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग पार्टी सुरू होती. एनसीबीचे अधिकारीही प्रवासी म्हणून क्रूझमध्ये चढले होते. ड्रग्ज पार्टी सुरू झाल्यानंतर एनसीबीने छापा टाकला. एनसीबीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. क्रूझवर असलेल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. यामध्ये एका बॉलिवूड कलाकाराच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याने ड्रग्जचे सेवन केले होते की नाही हे अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कारवाईनंतर क्रूझ मुंबईला परत आणण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. क्रूझवरील सर्व लोकांची डोप टेस्ट केली जाऊ शकते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रूझवर छापा टाकण्यात आला, जिथे पार्टी चालू होती आणि त्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. हे जहाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पार्टी असल्याची माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. काही प्रवाशांकडून प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.