बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेमध्ये आत्मनिर्भर - महापौर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, 5 ऑगस्ट (हिं.स.) बृहन्मुंबई महानगरपालिका जगभरातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा आपल्या रुग्णालयामध्ये समावेश करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा - सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. कस्तुरबा रुग्णालयात सुरू करण्यात आलेले जिनोम सिकवेन्सींग लॅब ही जनुकीय तपासणीचा महत्त्वपूर्ण टप्पा असून मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेमध्ये आत्मनिर्भर झाली असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
कस्तुरबा रुग्णालयातील संदर्भ आण्विक निदान प्रयोगशाळेत सुरू करण्यात आलेल्या जिनोम सिकवेन्सींग लॅबची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उप महापौर अँड. सुहास वाडकर यांच्यासमवेत आज दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजी पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयातील संदर्भ आण्विक निदान प्रयोगशाळेच्या प्रमुख श्रीमती जयंता शास्त्री उपस्थित होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की,
मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब सुरू करण्यात आल्यामुळे दिल्ली, पुणे ऐवजी आपल्याकडे आता तीन दिवसात ३८४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. या तपासणीमध्ये कोरोनाच्या जनुकीय बदलांमध्ये नवीन काय बदल झाले ? हे डी. एन. ए., आर. एन. ए. च्या न्युक्लोटाईड तपासणीमध्ये बघता येणार आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव होत आहे तेथील काही नमुने तपासणीसाठी घेऊन नवीन जनुकीय बदल तपासता येणार आहे.
कोरोनाचा विषाणूमध्ये झालेला बदल शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग लॅब उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल, असे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच पाच राज्यातील सहा आठवड्यांच्या बाळाचे रक्त नमुने येथील या संदर्भ आण्विक निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी येऊन त्याच्या एचआयव्ही तपासणीचे निदान सुद्धा आपल्याकडे होत असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबईमध्ये सुरु झालेली जिनोम सिकवेन्सींग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली असून त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल महापौरांनी महापालिकेचे कौतूक केले.
जिनोम सिक्वेसिंग लॅब विषयी: नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरुन विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जिनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड – १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. त्यासोबत ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांनी देखील सुमारे ४ कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. सदर जीनोम सिक्वेसिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.