पर्वत शिखरावरील सैनिकांना 'कार्गो-ड्रोन' पोहचवणार रसद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : हिमालयाच्या उंच शिखरावर मातृभूमीच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना रसद पोहचवणे सैन्यासाठी मोठे आव्हान असते. यावर उपाय म्हणून भारतीय सैन्य आता ‘कार्गो-ड्रोन’ची मदत घेणार आहे. त्याद्वारे सैनिकांना जेवण, साहित्य, औषधे आणि दारूगोळा पोचवण्याची योजना आहे. त्याकरिता एका भारतीय कंपनीला 48 हेक्साकॉप्टर ड्रोन्स खरेदीचा ऑर्डर देण्यात आलाय.
यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लद्दाखच्या पूर्व भागात एलएसी वर चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून सज्ज आहे. याठिकाणी तैनात असलेल्या जवानांसाठी रसद पोहचवणे हे जिकरीचे काम आहे. यासाठी लागणारे वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याकरिता आता भारतीय सैन्याने लद्दाख आणि इतर उंच पर्वतीय क्षेत्रात ड्रोनच्या माध्यमातून रसद पोहवण्याची तयारी सुरू केलीय. त्यानुसार एका भारतीय कंपनीला 48 हेक्साकॉप्टर ड्रोन खरेदीचा ऑर्डर देण्यात आलाय. हे एमआर-20 ड्रोन 20 किलो वजनाचे साहित्य वहन करण्यास सक्षम आहेत. या कार्गो ड्रोनच्या वापराचे प्रशिक्षण देखील सैन्याने सुरू केले आहे. भारतीय सैन्य रॅफे एमफिब्र कंपनीकडून हे 48 कार्गो-ड्रोन्स विकत घेणार आहे. हे ड्रोन सियाचिन सारख्या उंच पर्वतीय क्षेत्रात आणि पाणबुड्यांमधूनही लाँच करता येतात. रॅफे एमफिब्र कंपनीच्या स्टेटमेंटमध्ये नमूद केल्यानुसार कंपनीने आतापर्यंत 169 पेटेंट करण्याजोग्या तंत्रज्ञान विकसीत केलेय. यामध्ये विविध अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. जगातील अनेक शक्तीशाली देशांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रोन्सचे महत्त्व ओळखले आहे. भारतीय सैन्यासाठी देखील एमआर-20 ड्रोन्स एखाद्या वरदानाप्रमाणे उपयुक्त ठरतील असा विश्वास संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. यासोबतच भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने मुंबईतील आयडिया-फोर्ज कंपनीला सर्व्हिलान्स ड्रोन्ससाठी 130 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. यासर्व साहित्याच्या उपलब्धतेनंतर भारतीय सैन्य अधिक संहारक आणि सुसज्ज होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.