प्रख्यात स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या कमला भसीन यांचे शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. महिला हक्क चळवळीच्या लढ्यात त्यांचे विशेष योगदान होते. दक्षिण आशियाई भागात भसीन यांनी महिला हक्क आंदोलन पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
काही महिन्यांपूर्वीच त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. कमला यांच्या 'क्योंकि मै लडकी हूं', 'मुझे पढना है' या कविता विशेष लोकप्रिय होत्या. भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.
त्यांच्या मृत्यूची बातमी कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. श्रीवास्तव यांनी लिहिले, “कमला भसीन, आमची प्रिय मैत्रीण, आज 25सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील महिलांच्या चळवळीसाठी हा एक मोठा धक्का आहे. तिने कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आयुष्य जगली. कमला तू नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहशील. तुझी बहीण जी खूप दु:खात आहे.
त्यांचा जन्म 24 एप्रिल, 1946 रोजी झाला होता. 1970 च्या दशकापासून भसीन भारतातील तसेच इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये महिलांच्या चळवळीतील एक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. 2002 मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ची स्थापना केली, जी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित स्त्रियांसोबत काम करते, बहुतेकदा नाटक, गाणी आणि कला यांसारख्या साधनांचा वापर करते.