देशात ब्लॅक फंगसचं थैमान!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावासह आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस या आजारानं थैमान घातलंय. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीसह त्याचा धोकाही वाढलाय. अशावेळी अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्यात आलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.
डॉ. पॉल यांनी सांगितलं की, ज्यांची शुगर लेव्हल 700 ते 800 पर्यंत पोहोचते, त्याला डायबिटीक कीटोएसीडोसिस असंही म्हणतात. अशा रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक असतो. अशास्थितीत मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही या आजाराला बळी पडू शकतो. दरम्यान, स्वस्थ व्यक्तीला ब्लॅक फंगसमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशा लोकांनाच या आजाराचा जास्त धोका असल्याचं एम्सचे डॉ. निखिल टंडन यांनी म्हटलंय. ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.