चुलबुल पांडे’ला घरी घेऊन गेलो तर आई कानशिलात लगावेल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा उद्या १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानची पोलिस अधिकाऱ्याची सगळ्यात गाजलेली भूमिका म्हणजेच ‘दबंग’ या चित्रपटातील चुलबुल पांडे. तर, सलमानला विश्वास आहे की जर तो खऱ्या आयुष्यात या भूमिके सारखा असता तर त्याच्या आई-वडिलांनी त्याला मारले असते.
नुकतीच सलमानने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत यावर चर्चा केली. “अजुनही कोणता चित्रपट पाहिला की त्यात असलेल्या हीरोसारखे व्हायची माझी इच्छा होते. त्या हीरोने केलेल्या चांगल्या कामांमुळे मी इतका प्रभावित होतो की मला त्या भूमिकेला घरी घेऊन जाण्याची इच्छा होते. अगदी मी करतो त्या चित्रपटातील भूमिका देखील. चुलबुल हे एक पात्र आहे, पण त्या पात्राला घरी घेऊन जाऊ शकत नाही. राधे देखील एक पात्र आहे, पण मी त्यांच्यासारखा वागू शकतं नाही. मी माझ्या घरी आई-वडिलांसमोर चुलबुल पांडे सारखा फिरु शकतं नाही, असं केलं तर माझे वडील मला मारतील आणि आई कानशिलात लगावेल, तर भाऊ-बहिणीला लाज वाटेल. म्हणून मी घरी फक्त एक मुलगा आणि भावासारखाच वागतो,” असं सलमान म्हणाला.