चार दिवसांनंतर पुणे बंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी खुला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे बंगळुरू : गेल्या सलग चार दिवसांपासून बंद असलेला पुणे बंगळुरू महामार्ग अखेर आज सकाळी दहा वाजता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. महापुराने पुणे बेंगलोर महामार्ग व्यापून टाकला होता शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट तर काही ठिकाणी दहा फुटावर पाण्याची पातळी झाली होती. त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आला होता.
चार दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज सकाळी झपाट्याने पाणी ओसरले. सकाळी साडेनऊ वाजता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर दहा वाजता महामार्गावरील वाहतूक खुली करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण भोसले तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते.
महापुरामुळे येथील पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आले होते. मुंबई -पुण्याहून बंगळूरूकडे जाणारी वाहने अडकलेली होती. तर, दूधगंगा नदीलाही महापूर आल्याने कर्नाटक, दक्षिण भारतातून पुणे -मुंबईकडे जाणारी वाहने देखील जागीच थांबली होती. दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्गावर काल ६ फुट पाणी असतानाही मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, महामार्गाच्या पाहणीनंतर लक्षात आलं की, सुमारे ४०० मीटर अंतरावर खूपच अधिक पाणी आहे. प्रवाहाची गती लक्षात घेता सध्या वाहतूक सुरू होऊन शकत नाही. पोकलॅन्ड सुद्धा २५ मीटर हुन अधिक पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली आणि पाणी ओसरल्याने आता ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. राष्ट्रीय मार्ग सुरु झाल्यानंतर या वाहनांकडून टोल नाक्यावर तीन ते चार दिवस टोल आकारू नये, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रविवारी तातडीने निवेदनाव्दारे केली.