काटोल 'कृउबास' निवडणुकीत अनिल देशमुख यांचे पॅनेल पराभूत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर : काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला आहे. भाजपाच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने देशमुख यांच्या पॅनलचा १८ पैकी १४ म्हणजे भाजपा १४ आणि राष्ट्रवादी ४ या फरकाने पराभव केला आहे.
देशमुख यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ससेमिर्यामुळे ते गायब झाले आहेत. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला झाला आहे. भाजप समर्थक पॅनलने सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, तर ग्राम पंचायत मतदार संघातून ३ असे १४ उमेदवार निवडून आले आहे. काटोल नगर परिषदेचे गटनेते चरणसिंग ठाकूर आणि केशवराव डेहनकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढवली होती. दुसरीकडे कळमेश्वर बाजार समितीवर काँग्रेस समर्थक केदार गटाने एकतर्फी विजय मिळवला आहे. रविवारी दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत केदार गटाने दोन्ही जागा पटकावल्या. दरम्यान नरखेड बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्थेच्या गटातून ११ पैकी महाविकास आघाडी पॅनलने ५ आणि बळीराजा सहकार पॅनलने ६ जागा जिंकल्या आहे. ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने चारही जागा जिंकल्या आहे.