कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या करून आरोपीची आत्महत्या
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर : नागपुरातील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलोक माटूरकर असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (14 वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (12 वर्ष) सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेव्हणी अमीषा बोबडे यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी आलोक पाचपावली परिसरात रंभाजी रोड बागल व्यायाम शाळेजवळ भाड्याच्या घरात राहत होता. तर सासू आणि मेव्हणी त्यांच्या घरापासून 100 मीटर दूर पटवी गल्ली इथे वास्तव्याला होत्या. आलोकने रविवारी रात्री सासू आणि मेव्हणीची हत्या केली. त्यानंतर घरी येऊन पत्नी आणि मुलांची हत्या करत गळफास लावून आत्महत्या केली. आलोकचा टेलरिंगचा व्यवसाय होता. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.