बीएमसीचे उत्तम धोरण आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे कोरोना संसर्गावर योग्य नियंत्रण - राजेश टोपे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : बृहन्मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या पाहता, कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग रोखणे तसेच त्यावर नियंत्रण मिळविणे ही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी होती. असे असले तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले, याचे श्रेय महानगरपालिकेच्या यंत्रणेला, उत्तम प्रशासकीय धोरणांना आणि नियोजनबद्ध कामकाजाला जाते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. राजेश टोपे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एन विभागातील विक्रोळी (पश्चिम) येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते आज (दिनांक २४ ऑगस्ट २०२१) सकाळी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी व समलैंगिक नागरिकांसाठी (एलजीबीटी) विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे लसीकरण केंद्र संपूर्णपणे एन विभागाच्या आरोग्य विभागाकडून संचालित करण्यात येणार आहे. त्यासाठी एलजीबीटी समुदायाच्या हितासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्थांचेही सहकार्य लाभत आहे. मुंबई महानगरातील तृतीयपंथ व एलजीबीटी नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथ नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
आज पहिल्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे १०० तृतीयपंथी नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले.
तृतीयपंथी व एलजीबीटी संबंधीत क्षेत्रात कार्यरत सर्व बिगर शासकीय संस्थांना महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, त्यांनी सर्व तृतीयपंथी नागरिकांना विक्रोळीतील सेंट जोसेफ शाळेतील या विशेष लसीकरण केंद्रावर येवून कोविड लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या अनुषंगाने कोणतीही माहिती आवश्यक असल्यास अथवा समस्या असल्यास संबंधित नागरिकांनी व त्यांना मदत करु इच्छिणाऱयांनी एन विभाग वॉर्ड वॉर रुम संपर्क क्रमांक ०२२ – २१०१०२०१ यावर संपर्क साधावा. सदर दूरध्वनी वाहिनी २४ तास कार्यरत असते, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.