राज्य सरकारने विनाविलंब फेरीवाला धोरण अंमलात आणावे - प्रविण दरेकर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : महापालिका किंवा प्रशासन झोपले आहे का? राज्यात खुलेआम हफ्ते गोळा करणारी, गुंडगिरी करणारी मोठी गुन्हेगारी साखळी निर्माण झाली आहे. यावर आताच जर निर्बंध घातले नाही तर अशा प्रकारची अनेक गुंड प्रवृत्ती राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि एक कल्पिता पिंपळे नाही तर अनेक कल्पिता पिंपळे व अधिकाऱ्यांना अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. तसेच राज्य सरकारने विनाविलंब महापालिकेचे फेरीवाला धोरण अंमलात आणावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरेकर यांनी सांगितले की,राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे या सर्वांच्या मुळाशी जाऊन त्यांना ठेचून काढले पाहिजे . त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांविरोधात मोक्काची कारवाई करवी तसेच फेरिवाला धोरण तात्काळ अमलात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, २००४ साली ९९४३५ फेरीवाले राज्यात होते, २०१४ च्या सर्वेक्षणानुसार अधिकृत परवान्याद्वारे १५,३८१ होते. त्याचबरोबर १३६६ रस्ते प्रस्तावित केले होते जेथे फेरीवाले बसतील आणि ३० हजार जागा त्यांना बसण्यासाठी नक्की केल्या होत्या. परंतु यापुढे काहीच झाले नाही हे दुर्दैवी आहे, अशी खंतही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात अधिकृत फेरीवाले कोण आहेत? त्याची यादी, त्यांचे नाव, नंबर जाहीर करावे. राज्य सरकारने जर यावर आता कडक निर्बंध लावले नाही तर हे प्रकरणसुद्धा एसआरएसारखे व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, दर ५ वर्षांनी एसआरएमध्ये अनेक झोपडपट्ट्याना सामावून घेण्यासाठी वर्ष वाढवावी लागतात. जर फेरिवाल्यासंबंधात असे झाले तर मुंबईच्या रस्त्यावरून चालणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन जाईल व अशा अनेक कल्पिता पिंपळे गुंडांकडून बळी जातील, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.