मार्क झुकरबर्गला ४४ अब्ज रुपयांचा आर्थिक फटका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सोमवारी तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्या होत्या. यामुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४४ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.
या कंपनीच्या शेअर्सची सोमवारी मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासूनच कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आलीय. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेलाय. सोमवारी फेसबुकच्या सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला.
मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाल्याचं सांगण्यात आले.