मुंबईतील 3 कोविड सेंटर 1 जून पर्यंत राहणार बंद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात नुकतेच येऊन गेलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळाने मुंबईसह आजुबाजुच्या परिसरात मोठे नुकसान केले आहे. मुंबईत महानगरपालिके तर्फे चालू करण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरलादेखील याचा फटका बसला आहे. त्यामुळे मुंबईतील बीकेसी, मुलुंड आणि दहिसर येथील कोविड सेंटर हे 1 जून पर्यंत दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा या कोविड सेंटरला बसला होता.
चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टी जवळ येण्यापूर्वीच सेंटरमधील जवळपास 500 रूग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. या कोविड सेंटरचे झालेले नुकसानाची दुरूस्ती करण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात पावसामुळे सेंटरवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी हे सेंटर10 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नविन रूग्णांना या कोविड सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत आजपासून पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बीकेसी, मुलुंड, दहीसर कोविड सेंटरमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या नागरिकांनादेखील याचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र पुढील आदेश येत पर्यंत नविन रूग्णांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.