“मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी भाजपानं केली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तसे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. मात्र, यावरून आता भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर या पत्रावरून टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांचं हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
राज्यात महिला अत्याचाराची लाट…
“रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना पाहाता करोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी राज्यात महिला अत्याचाराची तिसरी लाट येतेय की काय, अशी स्थिती राज्यात येऊ लागतेय. यासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी भाजपाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या. भाजपाच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
“हे मुख्यमंत्र्यांचं पत्र वाटतच नाही”
“राज्यातली एक महिला म्हणून मी अत्यंत व्यथित आहे. हे कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र वाटतच नाही. मुख्यमंत्री म्हणताना स्वत:ला कुटुंबप्रमुख म्हणतात. पण या कुटुंबप्रमुखाला हे माहिती आहे का की आपल्या नाकाखाली या महाराष्ट्रात काय घडतंय. या अशा बलात्काराच्या, महिला अत्याचाराच्या घटना रोज घडतायत. मग त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली तर त्यात गैर काय? तुमच्या राज्याच्या डीजींना बोलवा आणि या काळात राज्यात किती महिलांचं अपहरण झालं त्याची माहिती घ्या”, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
रम्यान, राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “इतक्या घटना होत असताना सर्वज्ञानी म्हणतात असं काय घडलंय अधिवेशन घ्यायला? तुमच्या तोंडाचा फेस निघतोय हे सांगताना की 5 वर्ष आमच्या सरकारला धोका नाही. याच्यापलीकडे तुम्ही बोलता काय? तुम्ही राज्यपालांना विरोधकांची थोबाडं फोडायला सांगता. सरकारचं थोबाड फोडा, आहे का तुमच्यात हिंमत. इतक्या घटना होत असताना हे सरकार षंढासारखं बसलंय”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.