काश्मिरात जिहादी दहशतवाद्यांकडून तिघांची हत्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काश्मिरात जिहादी दहशतवाद्यांकडून तिघांची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात जिहादी दहशतवाद्यांनी मंगळवारी 3 विविध दहशतवादी घटनांमध्ये तिघांची हत्या केलीय. मृतांमध्ये एका काश्मिरी पंडिताची समावेश आहे. या घटनेमुळे खोऱ्यात परतणाऱ्या हिंदूंमध्ये दहशत पसरली असून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी घटनांवर शोक व्यक्त केलाय.

यापैकी पहिली घटना श्रीनगरमधील इक्बाल पार्कजवळ घडली. ज्यात बिंदरू मेडिकेटचे मालक माखनलाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, माखन लाल बिंदरू यांच्यावर त्यांच्या दुकानातच गोळ्या झाडण्यात आल्या. ते प्रसिद्ध औषध विक्रेते होते. तसंच जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतरही ते येथून गेले नाही. ते आपल्या पत्नीसह श्रीनगरमध्ये राहत होते आणि त्यांनी आपली फार्मसी बिंदरू मेडीकेट चालवत होते. त्याचवेळी, श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ आणखी एक घटना घडली, ज्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्याला गोळ्या घातल्या. तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली ज्यात बंदुकधाऱ्यांनी एका मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, श्रीनगर आणि बांदीपोराच्या घटनाची माहिती मिळताच परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, मंगळवारी श्रीनगरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य केले गेलं. इक्बाल पार्कजवळ दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले औषध विक्रेता आणि काश्मिरी पंडित माखन लाल यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. सूत्रांनी सांगितलं की, माखन लाल यांचं गोळ्यांमुळे बरंच रक्त गेलं होतं. दुसऱ्या हल्ल्यात मृत झालेल्या रस्त्यावरील फेरीवाला वीरेंद्र पासवान हा बिहारचा असल्याचं समोर आलं. तिसरी घटना बांदीपोराच्या हाजीन भागात घडली, ज्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शफीचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. जिहादी दहशतवादी त्यांच्या योजनांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत आणि अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. यासोबतच माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी देखील जिहादी दहशतवादी घटनांवर दुःख व्यक्त केलेय.