८ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : करोना साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी लाट पूर्णपणे ओसरायला मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात आठ जिल्ह्यांत बाधितांचे प्रमाण अजूनही पाच टक्क्यांवर असून तेथे चिंताजनक स्थिती कायम आहे. चाचण्यांमध्ये झालेली घट, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा कमी प्रमाणात शोध आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन यामुळेही दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ असल्याची निरीक्षणे तज्ज्ञांनी नोंदविली आहेत.
पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली आणि ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. या काळात दर आठवड्याला सुमारे ६० ते ७० हजार रुग्णांचे निदान केले जात होते. उत्तरोत्तर पहिल्या लाटेचा प्रभाव झपाट्याने कमी होत गेला आणि महिनाभरातच म्हणजे नोव्हेंबर २०२० मध्ये दर आठवड्याच्या रुग्णसंख्येच्या आलेखात जवळपास निम्म्याने घट झाली. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण २० हजारांपर्यंत खाली आले होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत रुग्णसंख्येत जवळपास ७० टक्क्यांनी घट झाल्याचे आढळले आहे.
दुसऱ्या लाटेची सुरुवात साधारणपणे फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ६० हजार रुग्णांचे नव्याने निदान केले गेले. एप्रिलमध्ये लाटेने उच्चांक गाठला. आठवड्याची रुग्णसंख्या सुमारे साडेचार लाखांवर गेली. मेपासून मात्र पुन्हा रुग्णसंख्येचा आलेख घसरायला सुरुवात झाली. मेच्या शेवटच्या आठवड्यात दर आठवड्याची रुग्णसंख्या सुमारे एक लाखापर्यंत खाली आली. महिनाभरात रुग्णसंख्येत मोठी घट आढळली असली तरी जूनमध्ये मात्र रुग्णसंख्येचा आलेख बराच काळ स्थिरच राहिल्याचे दिसून येते.
जूनमध्ये आलेख स्थिरच
जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे ८० हजार रुग्णांची नव्याने भर पडली. त्यानंतर यात काही अंशी घट होऊन हे प्रमाण सुमारे ६५ हजारांवर आले. परंतु यानंतर मात्र पूर्ण महिनाभर रुग्णसंख्येत काही अंशी घट होत राहिली तरी रुग्णसंख्येचा आलेख सुमारे ६० हजारांपर्यंतच स्थिर राहिला आहे. २७ ते ३ जुलै या कालावधीत ६१ हजार ९९४ रुग्णांची भर पडली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
चाचण्या आणि संपर्कशोधावर भर आवश्यक
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ राहिला असून याला ‘थिक टेल’ असे म्हटले जाते. म्हणजे लाट ओसरत आली तरी तिचा प्रभाव बराच काळ राहणे. निर्बंध शिथिल केल्यानंतर करोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ज्या आठ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांहूनही अधिक आहे, तेथे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध कमी प्रमाणात घेतला जात आहे. एका रुग्णामागे किमान २० जणांचा शोध घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या गेल्या तरी त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. तसेच चाचण्यांचे प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे या दोन्हींवर अधिक भर द्यावा लागणार आहे. तसेच बाधितांचे प्रमाण अधिक (रेड झोन) असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध अधिक कठोर करणे आवश्यक आहे. जनुकीय क्रमनिर्धारण आणि ‘सेरो सर्वेक्षण’ मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.