लवकरच तुटणार कोहली-शास्त्रींची जोडगोळी, 'या' टूर्नामेंटमधील कामगिरीवर ठरणार भवितव्य
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेl. कारण रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
लवकरच तूटणार शास्त्री-कोहली जोडी
रवी शास्त्री यांच्याकडे आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आगामी टी-२० विश्वचषक ही शेवटची संधी असणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेपर्यंतच आहे. जर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले तर बीसीसीआय त्यांचा करार वाढवण्याबाबत विचार करू शकते.
रवी शास्त्रींना सतत आले अपयश
रवी शास्त्रींनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून भारतीय संघाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना, २०१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावला आहे. त्यामुळे रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षक पदावरून राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरू लागली आहे.
अनिल कुंबळेच्या जागी करण्यात आली होती नियुक्ती
भारतीय संघाचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांनी २०१६-१७ या कालावधी दरम्यान भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, २०१७ मध्ये रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वी २०१४-१६ दरम्यान रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या डायरेक्टरची भूमिका पार पाडली होती.
रवी शास्त्रींना काढून टाकण्याची मागणी धरतेय जोर
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या पराभवानंर रवी शास्त्रींनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर शास्त्री आणि कोहली जोडगोळी तुटण्याची दाट शक्यता आहे.