राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण, गरमीने होणार हालेहाल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभरात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी मुंबईत वैशाख वणव्याची धग, तर कोकणात तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे.
मुंबई परिसरात तापमान वाढणार
मुंबई शहर आणि उपगनरांमध्ये वैशाख वणव्याचे चटके बसत आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान ३६ अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार असून काहिली काहिली होणार आहे.
कोकणासह उर्वरित राज्यातील अंदाज
कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, तसेच ९ मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दक्षिणेपासून मध्य प्रदेश दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण
या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे.