माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंंगळवारी सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यशपाल हे जगातील अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. शर्मा यांच्या निधनानंतर माजी कर्णधार कपिल देव यांना अश्रू अनावर झाले. ११ ऑगस्ट १९५४ रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये शर्मा यांचा जन्म झाला होता. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करून परतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. कुटुंबियांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
क्रीडा कारकिर्द
शर्मा यांनी आपल्या कारकिर्दित अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांनी पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांसारख्या संघातील दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. पण ते कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. या मालिकेत यशपाल शर्मा हिरो ठरले होते. त्यांनी सेमीफायनल सामन्यात ६१ धावांची खेळी केली होती.
शर्मा १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती. एकूण ३७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात ३४ च्या सरासरीने १,६०६ धावा केल्या. तर ४२ एक दिवसीय सामन्यांत शर्मा यांनी ८८३ धावा केल्या होत्या. १९८० च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होते. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी केली होती. तर इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यांनी ६१ धावांची खेळी केली होती. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समिती सदस्य आणि समालोचकाची जबाबदारीही पार पाडली होती.
शर्मा यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २ ऑगस्ट १९७९ रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या पदार्पणाचा सामना खेळला होता. त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजच्या विरोधात २९ ऑक्टोबर १९८३ रोजी खेळला होता. या व्यतिरिक्त १३ ऑक्टोबर १९७८ रोजी पाकिस्तानच्या विरोधात एक दिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. इंग्लंड विरोधात २७ जानेवारी १९८५ रोजी शेवटचा एक दिवसीय सामना खेळले होते.
एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात शर्मा यांच्या शिवाय असे तीन आणखी फलंदाज आहेत जे कधीच शून्यावर बाद जाले नाहीत. यात सर्वांत आघाडीवर केप्लर वेसेल्स आहेत केप्लर यांनी १० वर्षांत १०९ एक दिवसीय सामन्यांत ३,३६७ धावा केल्या पण कधी शून्यावर बाद झाले नाहीत. दुसऱ्या स्थानावर जेक्स रोडल्प आहेत. त्यांनी ४५ एक दिवसीय सामन्यांत ११७४ धावा केल्या. हे देखील कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पीटर ख्रिस्टन यांचा क्रमांक लागतो. ख्रिस्टन यांनी ४० एक दिवसीय सामन्यांत १२९३ धावा केल्या. पण ते देखील कधीच शून्यावर बाद झाले नाहीत.
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते
शर्मा हे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. दिलीप कुमार यांनी आपले करिअर घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, असेही ते म्हणाले होते. पंजाबचा रणजी सामना पाहून दिलीप कुमार यांनी शर्मांसाठी बीसीसीआयमध्ये राजसिंग डूंगरपूरशी चर्चा केली होती.