दिल्लीतल्या शाळा पुन्हा गजबजणार! ५० टक्के उपस्थितीस परवानगी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दिल्लीतल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) सोमवारी सांगितलं की प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त ५० टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शाळांमध्ये बोलावले जाऊ शकते. डीडीएमएने म्हटलं आहे की शाळांनी कोविड -१९ नियमांचे पालन करून वर्गखोल्यांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार वेळापत्रक तयार केले पाहिजे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येऊ दिले जाणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे की शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी, सकाळच्या सत्रात शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ आणि दुपार किंवा संध्याकाळच्या दुसऱ्या सत्रातल्या विद्यार्थ्यांची शाळा भरण्याची वेळ यात किमान एक तासाचे अंतर असणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण, पुस्तके, कागद आणि स्टेशनरी वस्तू एकमेकांसोबत शेअर करू नये अशा सूचनाही दिल्या आहेत.
गेल्या आठवड्यात, डीडीएमए समितीने दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अहवाल सादर केला होता आणि ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. यासंदर्भात शुक्रवारी निर्णय घेण्यात आला आणि १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात, असा निर्णय घेण्यात आला.
इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी १ सप्टेंबरपासून शारीरिक वर्गात उपस्थित राहू शकतात, तर ६वी ते ८ वी चे वर्ग आठवड्यानंतर ऑफलाइन पुन्हा सुरू होऊ शकतात.