खबरदारी घेऊन निर्बंध शिथिल करावेत! तज्ज्ञांचे मत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सर्व निर्बंध शिथिल करणे धोकादायक आहे. आवश्यक ती काळजी घेऊनच काही निर्बंध शिथिल करणे योग्य ठरेल.
बेसावध राहिल्यास अमरावतीप्रमाणे पुन्हा संसर्ग वाढीचा धोका नाकारता येणारा नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त के ले आहे.
मुंबईसह काही शहरांमध्ये रुग्णसंख्या गेल्या काही आठवड्यांपासून कमी झाली असून संक्रमणही कमी होत आहे. सध्या लागू के लेले निर्बंध ३१ मेपर्यंत आहेत. येत्या काळात निर्बंध शिथिल करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे. मात्र, निर्बंध खुले करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. संसर्गाचा धोका अद्याप पुरता टळलेला नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त के ले आहे.
मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असून मृतांची संख्याही कमी होत आहे. पुढील दहा दिवसांत मृतांमध्ये आणखी घट होईल. परंतु काही जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अमरावतीमध्ये हे प्रामुख्याने निदर्शनास आले. तेव्हा अमरावतीप्रमाणे पुन्हा मुंबईमध्ये संसर्गाचे संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही निर्बंध नक्की शिथिल करता येतील. आवश्यक दुकाने काही वेळापुरती खुली करावी. परंतु रेल्वे, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी निर्बंध पूर्णपणे शिथिल करू नयेत. सखोल विचार करून निर्णय घ्यावेत, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ.अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
अमरावतीमध्ये गृहविलगीकरण आणि करोना प्रतिबंधांच्या उपायांचे पालन योग्यरीतीने केले जात नव्हते. तसेच या जिल्यात जनुकीय परिवर्तित विषाणू असल्याचेही नाकारता येत नाही. त्यामुळे येथे पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये सध्या करोना संसर्ग प्रसाराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे काही बाबी खुल्या करता येतील हे खरे आहे. परंतु याचे नियोजन करताना करोना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन केले जाणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. काळजी न घेता निर्बंध शिथिल के ले तर आपण लवकरच तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ, असे करोना कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.