ऑलिम्पिक : पीव्ही सिंधूचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर २१-९, २१-१६ ने मात
टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने विजयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीमध्ये आज, बुधवारी झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली असून हा सामना २१-९, २१-१६ असा जिंकला आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय आहे. या विजयासह तिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आजच्या खेळीत सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधू हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर दबाव बनवून खेळत होती. सिंधू या सामन्यात काहीशी आक्रमक खेळी करताना दिसून आली. तिने पहिल्या सेटमध्ये २१-९ अशी आघाडी घेतली. त्यापाठोपाठ दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची झुंज मोडीत काढत हा गेम सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकत पुढची फेरी गाठली. या विजयी खेळीनंतर देशवासियांच्या तिच्याकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
या आधी झालेल्या पहिल्या फेरीत सिंधूचा सामना इस्रायलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाशी झाला होता. त्यात सिंधूने २१-७, २१-१० अशी मात केली होती. सिंधू आणि पोलिकारपोव्हा यांच्यातील लढत कमालीची एकतर्फी झाली होती. सिंधूने याही लढतीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले होते.