भारत-इंग्लंड कसोटी मालिका : इंग्लंडचे डिवचणे भारतासाठी फलदायी – कोहली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचले. त्यामुळे शमी-बुमराची कामगिरी अधिक उंचावली आणि आपोआपच सर्व खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार झाला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर व्यक्त केली.
लॉडर्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला १५१ धावांनी धूळ चारली. दुसऱ्या डावात शमी आणि बुमरा यांनी नवव्या गड्यासाठी रचलेली ८९ धावांची भागीदारी भारताच्या विजयात मोलाची ठरली. यादरम्यान ऑली रॉबिन्सन आणि जोस बटलर अनेकदा शमी-बुमरा यांना डिवचताना आढळले.
‘‘संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉडर्सवर विजय मिळवणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला ६० षटकांत गुंडाळू, याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,’’ असे कोहली म्हणाला.
‘‘दुसऱ्या डावात शमी-बुमरा यांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंनी विनाकारण डिवचल्यामुळे मीसुद्धा ड्रेसिंग रूममध्ये संतप्त झालो. मात्र तेथून शमी-बुमरा यांनी सुरेख फलंदाजी केली आणि मग गोलंदाजीसाठी मैदानावर उतरताच त्यांनी इंग्लंडची त्रेधातिरपीट उडवली. त्यांचा जोश पाहून संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास बळावला,’’ असेही कोहलीने सांगितले.