45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहील-आरोग्यमंत्री राजेश टोपे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात आजपासून (१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे.
त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला अाहे. त्याप्रमाणे शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाइन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांच्या नियोजनासाठी कोविन ॲपमध्ये बदल करण्यात आले आहेत.
विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठवले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.