लॉकडाउनच्या भीतीने बदलापुरात उसळली तुफान गर्दी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बदलापूर : शनिवारपासून आठ दिवस कडक लॉकडाउन लागू होणार असल्याच्या चर्चेने शुक्रवारी बदलापूर बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. गुरूवारी पालिका मुख्यालयात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शहरात कडक निर्बंध लावण्यात येतील अशी माहिती प्रसारित झाली. मात्र त्याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने कोणतेही अधिकृत पत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. फक्त औषधालये सुरू राहतील असे संदेश प्रसारित झाल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
रूग्णसंख्या कमी करण्याच्या हेतूने गुरूवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत मुरबाडच्या धर्तीवर आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक संपन्न होताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शनिवारपासून बदलापूर शहरात कडक लॉकडाउन लागू करणार असल्याबाबतचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. चित्रफित आणि संदेश शहरभर प्रसारित झाल्य़ाने एकच खळबळ उडाली. शनिवारपासून लॉकडाउन होणार असल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. सर्वाधिक गर्दी शहरातल्या किराणा दुकानांवर झाल्याचे पहायला मिळाले. बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. बदलापूर पश्चिमेच्या बाजारपेठांमध्ये रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा पहायला मिळाला.