राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दर महिन्याला तीन कोटी कोविड लसींची आवश्यकता : आरोग्यमंत्री राजेश टोपे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
हिंगोली : राज्यात कोविड चाचण्यांसोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जात आहे. लसीकरणासाठी दर महिन्याला तीन कोटी लसींची आवश्यकता असून त्याची मागणी केंद्र शासनाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी ता. २० येथे दिली आहे.
येथील शासकिय रुग्णालयात त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत पाहणी केली. यावेळी रुग्णालयात उपलब्ध ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर, लस, औषधीसाठा याची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे, विस्तार व माध्यम आधिकारी प्रशांत तुपकरी
त्यानंतर बोलतांना टोपे म्हणाले की, राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून कोविड चाचण्या वाढवाव्यात. दिवसातून किमान दोन हजार चाचण्या करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून लसीचे प्रमाण वाढवून दिले जात आहे. राज्याला दर महिन्याला तीन कोटी लसींची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्राकडे मागणी नोंदविण्यात आली असून मागणी नुसार लस उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाकडून सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन तर उपजिल्हा रुग्णालयात, सीटीस्कॅन, डायलेसीस, सोनोग्राफी मशीन व इतर अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील आरोग्य विभागातील सर्व पदे भरली जाणार आहे. सध्या गट क व गट ड संवर्गातील पदे भरली जात आहेत. ता. २५ व ता. २६ सप्टेंबर रोजी परिक्षा घेतल्या जाणार असून या परिक्षा पारदर्शकपणे पार पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या जिल्हयात गैरप्रकार आढळून येत असल्याचे दिसून आल्यास तातडीने पोलिस कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.