मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं हे सलग त्यांचं तिसरं वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील.
आजच्या घडीला ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असंही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचं अभिनंदन केलं आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितलं आहे. गेल्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. ममता यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीकास्त्र सोडलं. नड्डा म्हणाले, “ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने हा अधिकार दिलेला आहे. पण आम्हीही ही शपथ घेतो की आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु”.