खवले मांजराच्या खवल्यांची वाहतूक करणारा एकजण ताब्यात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
रत्नागिरी : रत्नागिरीजवळील हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३.४६४ किलो खवले मांजराची खवले जप्त करण्यात आली. सचिन गजानन ढेपसे (४१, रा. सुपलवाडी, नाचणे, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे यांना काल मिळाली होती. त्यानुसारच हातखंबा येथे पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी संशयित आपल्या यामाहा मोटारसायकलवरून जात असता पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे खवले मांजराचे खवले आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पोलीस खाते आणि वन विभागाने एकमेकांच्या सहयोगाने कामगिरी करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच भाग म्हणून वन विभागातील अनेक तज्ज्ञांकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या ३२ अधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचा उपयोग काल झाला. खवले मांजराच्या खवल्याची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करणे शक्य झाले. पोलीस निरीक्षक विनायक नरवणे, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे, पोलीस हवालदार महेश गुरव, आशीष शेलार, राजेश भुजबळराव, परेश पाटोळे, उदय चांदणे यांनी ही कारवाई केली.