कोरोना नियमांचे पालन करून यंदा लालबागचा राजा होणार विराजमान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा विराजमान झाला नव्हता. मात्र यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच गणेशोत्सव साजरा केला जाईल, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जाहीर केले आहे. लालबागच्या राजा गणपतीच्या दर्शनाला केवळ मुंबई आणि उपनगरातील नव्हे तर अन्य ठिकाणांहून भक्त येतात. त्यामुळे गेल्या वर्षी काहीशी निराशा झालेल्या भक्तांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे.
गणेशभक्तांच्या विनंतीवरून या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणेशमूर्तीच्या उंची संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यावेळी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंडळाने भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते.
मंडळाच्या वतीने १९३४ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ८६ वर्षांत पहिल्यांदाच मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता.